दलित महिलेवर जंगलात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:21 AM2019-04-14T05:21:19+5:302019-04-14T05:21:23+5:30
सवर्ण गावकऱ्यांनी गावातील स्मशानभूमीत प्रवेश नाकारल्यामुळे एका दलित कुटुंबाला आपल्या परिवारातील एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावर फोजल खो-यातील जंगलात अंत्यसंस्कार करावे लागले.
सिमला : सवर्ण गावकऱ्यांनी गावातील स्मशानभूमीत प्रवेश नाकारल्यामुळे एका दलित कुटुंबाला आपल्या परिवारातील एका वृद्ध महिलेच्या मृतदेहावर फोजल खो-यातील जंगलात अंत्यसंस्कार करावे लागले. हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील धारा गावात ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, मरण पावलेली महिला सुमारे १०० वर्षे वयाची होती. दीर्घ आजारानंतर मंगळवारी तिचे निधन झाले होते. तिच्या मृतदेहावर गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू देण्यास सवर्ण गावकऱ्यांनी विरोध केला.
मृत महिलेचा नातू तापेराम याने एक व्हिडिओ जारी करून कुटुंबाची कैफियत मांडली. तापेराम आपली वेदना मांडत असताना पाठीमागे अंत्यसंस्कार चाललेले दिसतात. तो म्हणतो की, आम्ही जेव्हा अंत्ययात्रा घेऊन गावाच्या स्मशानभूमीत गेलो, तेव्हा सवर्ण गावकºयांनी आम्हाला विरोध केला. येथे अंत्यसंस्कार केल्याने देवतेचा कोप झाल्यास त्याला तुम्ही लोक जबाबदार असाल, असे आम्हाला गावकºयांनी सांगितले. त्यामुळे आम्ही मृतदेह जवळच्या नाल्यात घेऊन आलो आणि अंत्यसंस्कार केले.
कुलूचे उपायुक्त युनूस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मनालीचे उपविभागीय अधिकारी (एसडीएम) आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (डीएसपी) यांना प्रकरणाचा तपास करण्यास सांगण्यात आले आहे. व्हिडिओत असलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी आम्ही ग्रामस्थांशीही बोलत आहोत. (वृत्तसंस्था)
>तक्रार नोंदविण्यासाठी कोणी पुढे आले नाही
उपायुक्तांनी सांगितले की, तक्रार नोंदविण्यासाठी अजून तरी कोणी पुढे
आलेले नाही. नेमके काय घडले, याची माहिती आम्ही घेत आहोत. अशा
प्रकरणांत मी अत्यंत कठोर आहे. काही ठोस समोर आल्यास जबाबदार
असलेल्या कोणालाही मी सोडणार नाही.