३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:09 AM2018-12-10T06:09:10+5:302018-12-10T06:10:55+5:30
आसाममध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदा घुसखोर हुडकून काढण्यासाठी ‘एनआरसी’ तयार करण्यात येत आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’ (एनआरसी) प्रसिद्ध झाल्यावर त्यात समावेश नसलेल्या लोकांची नावे राज्याच्या मतदारयाद्यांमधून वगळली जाऊ शकतील, अशी शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.
आसाममध्ये बांगलादेशातून आलेले बेकायदा घुसखोर हुडकून काढण्यासाठी ‘एनआरसी’ तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत जे घुसखोर ठरतील त्यांना देशाबाहेर घालविणे हा अंतिम उद्देश असला तरी पहिला टप्पा म्हणून अशा लोकांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्याची संभाव्य कारवाई पहिल्या टप्प्यात केली जाऊ शकेल, असे या सूत्रांनी सूचित केले. ‘एनआरसी’चे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने व त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने अंतिम ‘एनआरसी’ प्रसिद्ध झाल्यावर पुढे काय करायचे हे न्यायालयाच्या निर्देशांशिवाय ठरविले जाऊ शकत नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
आसाममध्ये राजकारण तापले
विदेशी घुसखोर बाजूला राहून ही प्रक्रिया भारताच्याच दोन राज्यांमधील भांडणाचे कारण ठरली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एनआरसी’ला जोरदार विरोध केला आणि आसाममध्ये राहणाऱ्या बंगाली लोकांना स्वदेशातच निर्वासित करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप केला.