भारतात पोहचताच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, "मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 09:04 PM2023-09-08T21:04:45+5:302023-09-08T21:05:09+5:30
श्रद्धा प्रत्येकाचे आयुष्य सहज सोपे करते असं मला वाटते. विशेषत: जेव्हा तुम्ही कामात तणावात असता तेव्हा धार्मिक आस्था तुम्हाला एका ताकदीने ऊर्जा देत असते असं ऋषि सुनक यांनी म्हटलं
नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक जी-२० शिखर संमेलनाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी पोहचले आहेत. भारतात आल्यानंतर सुनक यांनी खलिस्तान मुद्दा, रशिया-यूक्रेन युद्धात भारताची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. मी एक हिंदू आहे, भारतातील माझ्या दौऱ्यात मी येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्यावर तेच संस्कार झालेत. भारतात आल्यानंतर मला मंदिरातही जाता येईल अशी अपेक्षा आहे. अलीकडेच मी आणि माझ्या कुटुंबाने रक्षाबंधन साजरी केली. आताही माझ्याकडे राख्या आहेत. परंतु यंदा वेळेअभावी मला कृष्णजन्माष्टमी साजरी करता आली नाही. परंतु मी मंदिरात जाऊन त्याची भरपाई नक्कीच करेन असं त्यांनी सांगितले.
तसेच या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा प्रत्येकाचे आयुष्य सहज सोपे करते असं मला वाटते. विशेषत: जेव्हा तुम्ही कामात तणावात असता तेव्हा धार्मिक आस्था तुम्हाला एका ताकदीने ऊर्जा देत असते असं ऋषि सुनक यांनी म्हटलं. त्याचसोबत रशिया-यूक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर काय भूमिका घेतो हे मी ठरवू शकत नाही. परंतु भारत हा आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्याचे पालन करणारा त्याचसोबत प्रत्येकांचे सीमांचा सन्मान करणारा देश आहे असं कौतुक ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी केले.
#WATCH | G-20 in India: On his connect with Hinduism, UK PM Rishi Sunak to ANI says, "I'm a proud Hindu, and that's how I was raised. That's how I am. Hopefully, I can visit a Mandir while I'm here for the next couple of days. We just had Raksha Bandhan, so from my sister and my… pic.twitter.com/U5RLdZX3vz
— ANI (@ANI) September 8, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. आम्ही दोघे मिळून भारत आणि ब्रिटन यांच्यात उद्योग संबंधित करारासाठी खूप मेहनत घेत आहोत. दोन्ही देशांसाठी हा फायदेशीर करार ठरेल. दोन्ही देश कसे पुढे जातील यासाठी आम्ही चर्चा करत असतो. त्यामुळे जी-२० सारख्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देत भारतासाठी हे यशस्वी ठरेल असा विश्वास वाटतो असं सांगत ऋषि सुनक यांनी भारतातील नातेवाईकांवर भाष्य केले. भारत येणे हे माझ्यासाठी वैयक्तिक खूप खास आहे. हा एक असा देश आहे ज्यावर मी खूप प्रेम करतो. या देशात माझे कुटुंब आलंय. मी ब्रिटनचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतासोबत चांगले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतोय असंही पंतप्रधान ऋषि सुनक यांनी म्हटलं.