साड्या आणि सूटमध्ये परदेशी पाहुणे, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पडली साडीची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:20 AM2023-09-11T06:20:38+5:302023-09-11T06:21:08+5:30
G20 Summit: ‘जी-२०’ बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी परदेशी पाहुण्यांसाठी रात्रभोजचे आयोजन केले होते. यावेळी अनेक देशांतील पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात आले होते.
नवी दिल्ली : ‘जी-२०’ बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी परदेशी पाहुण्यांसाठी रात्रभोजचे आयोजन केले होते. यावेळी अनेक देशांतील पाहुणे पारंपरिक भारतीय पोशाखात आले होते. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या पत्नी कोबिता आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा साडी परिधान केलेल्या दिसल्या.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा सलवार-कुर्त्यामध्ये रात्रीच्या जेवणात सहभागी झाल्या होत्या, तर उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी शाही निळ्या साडीत रात्रभोजला हजेरी लावली. याशिवाय भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या पत्नी क्योको पिवळ्या साडीत आल्या होत्या.
याशिवाय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची मुलगी सायमा वाजेब यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सेल्फी घेतला. रात्रभोजमध्ये राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह सुमारे ३०० लोक उपस्थित होते.