गगनयान मोहीम; तीन भारतीय अंतराळवीर झेपावणार अवकाशात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:23 AM2018-08-29T06:23:27+5:302018-08-29T06:24:06+5:30

२०२२चे लक्ष्य ठेवून ‘इस्रो’ची तयारी; सात दिवसांच्या सफरीनंतर उतरणार अरबी समुद्रात

Gaganaya campaign; Three Indian astronauts to escape in space! | गगनयान मोहीम; तीन भारतीय अंतराळवीर झेपावणार अवकाशात!

गगनयान मोहीम; तीन भारतीय अंतराळवीर झेपावणार अवकाशात!

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीरांना सोबत घेऊन अंतराळयान अवकाशात पाठविण्याची ‘गगनयान’ ही महत्त्वाकांक्षी योजना इस्रोने आखली असून, २०२२ चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून जय्यत तयारी सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ‘गगनयान’ची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २०२२ मध्ये वा त्याआधीच भारतातून, भारतीय यानातून भारताचा पहिला सुपुत्र वा सुकन्या अंतराळात झेपावेल आणि तेथे तिरंगा फडकवेल.

पंतप्रधानांच्या या योजनेचा तपशील अणुऊर्जा व अंतराळ संशोधन खात्यांचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी जाहीर केला. मानवाला अंतराळात पाठविण्याची ही मोहीम १० हजार कोटी रुपयांहून कमी खर्चात फत्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहीम यशस्वी झाल्यास मानवासह अंतराळयान सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतर चौथा देश ठरेल.
ते म्हणाले की, अंतिम टप्प्यात तीन अंतराळवीरांना घेऊन यान अवकाशात झेपावेल. हे यान पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतराच्या कक्षेत सात दिवस प्रदक्षिणा घालेल. या काळात अंतराळवीर कमी गुरुत्वाकर्षणात वावरण्याचा, कामे करण्याचा सराव व प्रयोग करतील. प्रत्यक्ष अंतराळवीर पाठविण्याआधी दोनदा मानवरहित याने पाठवून सर्व यंत्रणांची कसोशीने चाचणी घेतली जाईल.
सिवान यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी अवजड वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ‘जीएसएलव्ही-मार्क ३’ हा सिद्धहस्त अग्निबाण वापरला जाईल.
यानात जेथे अंतराळवीर बसतील तो कक्ष (क्रू मॉड्युल) सात मीटर उंचीचा व सात टन वजनाचा
असेल. सात दिवसांच्या सफरीनंतर यान अंतराळवीरांसह गुजरात किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सुखरूपपणे उतरविले जाईल.
‘इस्रो’खेरीज विविध विद्यापीठे, खासगी उद्योग तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांचा
सक्रिय सहभाग असल्याने ‘गगनयान’ राष्ट्रीय अभिमानाची मोहीम असेल, असे सिंग म्हणाले. योजनेस विलंब होऊ नये व उणीव राहू नये यासाठी मित्रदेशांची मदत, सहकार्य घेण्याचाही ‘इस्रो’चा विचार आहे, असे सिवान म्हणाले.
गगनयानच्या पूर्वतयारीचाच भाग म्हणून ‘इस्रो’ने गेल्या महिन्यात श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळतळावर ‘पॅड अ‍ॅबॉर्ट’ नावाची यशस्वी चाचणी केली. अपरिहार्य परिस्थितीत यान सोडून देण्याची वा नष्ट करण्याची वेळ आल्यास, अंतराळवीरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासंबंधी ही चाचणी होती.

अंतराळवीर कोण असतील?

च्भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी याआधी अमेरिका व रशियाच्या यानातून अवकाशात भरारी घेतली असली तरी भारतीय यानातून जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होण्याचा मान कोणाला मिळेल, हे स्पष्ट व्हायला प्रतीक्षा करावी लागेल.
च्कुशल व अनुभवी वैमानिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यांची निवड करून अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण देण्याचे काम ‘इस्रो’ व हवाई दल संयुक्तपणे करतील.

Web Title: Gaganaya campaign; Three Indian astronauts to escape in space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.