'गांधी कुटुंब, डॉ. सिंग यांना संरक्षण पुन्हा बहाल करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:02 AM2019-11-21T02:02:01+5:302019-11-21T06:32:14+5:30
राज्यसभेत आनंद शर्मा यांची मागणी
नवी दिल्ली : गांधी कुटुंब आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना राजकीय हेतूंच्या पलीकडे जाऊन स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) संरक्षण पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी राज्यसभेत बुधवारी केली.
या मागणीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एसपीजीचे संरक्षण काढून घेण्याचा निर्णय हा धोका किती प्रमाणात आहे याच्या आधारावर घेतल्याचे सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचा मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियांका गांधी यांना असलेले एसपीजीचे संरक्षण आणि डॉ. मनमोहनसिंग यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असलेले झेड प्लस संरक्षण केंद्र सरकारने या महिन्याच्या प्रारंभी काढून घेतले आहे.
शून्य कालावधीत आनंद शर्मा हा मुद्दा उपस्थित करून म्हणाले की, वरील चार नेत्यांचे संरक्षण त्यांना पुन्हा दिले जावे. नेत्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे सांगून शर्मा यांनी हे लक्षात आणून दिले की, केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह माजी नेत्यांचे संरक्षण कायम ठेवले गेले होते. वाजपेयी व इतरांचे संरक्षण संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत ना कमी केले, ना ते काढून घेतले, असे शर्मा म्हणाले. गांधी कुटुंब आणि डॉ. सिंग यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतल्यावर त्यांच्या जीविताबद्दलची काळजी साधार असल्याचे आढळले आहे, असेही त्यांनी म्हटले. शर्मा म्हणाले की, आमच्या नेत्यांचे जीवित, त्यांचे संरक्षण व सुरक्षा हे विषय राजकीय विचारांच्या पलीकडील असावेत, असे आमचे सरकारला आवाहन आहे.
निर्णय गृहमंत्रालयाचा
भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी संरक्षण काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हणाले की, तो निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून, गांधी कुटुंबाला असलेला धोका हा श्रीलंकेत एलटीटीई संपल्यामुळे आता नाहीसा झाला आहे.