लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनने सीमावर्ती भागात पुन्हा आपला कावेबाजपणा दाखवून दिला आहे. काही जवान कोरोनाबाधित आढळल्याने भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मार्चपासून सुरू केला जाणारा सराव काही दिवसांसाठी टाळला होता. याचा गैरफायदा घेत चीनने रणनीतीच्या दृष्टिकोनातून मोक्याचे ठिकाण असलेल्या लडाखमधील भागात कब्जा केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही चीनकडून झालेल्या आगळीकीला दुजोरा दिला आहे. सिंह म्हणाले की, याबाबत सैन्यप्रमुखांकडून माहिती घेतली आहे. लडाखमधील विशिष्ट भागात दोन्ही देशांनी दावा ठोकल्याने तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैनिक तिथे मोठ्या संख्येने जमले आहेत. दोन्ही बाजूंकडून याबाबत ६ जून रोजी चर्चा केली जाईल. ही चर्चा दोन्ही देशांचे लेफ्टनंट जनरल दर्जाचे अधिकारी करतील.
सूत्रांनी माहिती दिली की, भारतीय तिबेट सीमा पोलीस सब सेक्टर नॉर्थमध्ये मार्चमध्ये जवानांचा अभ्यास सुरू होतो. यात हिमाचल बेसमधील जवानांचा समावेश असतो; परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात काही जवानांना कोरोनाची बाधा झाल्याने अधिक संसर्ग होऊ नये म्हणून लडाखमध्ये केला जाणारा सैैन्याचा सराव स्थगित केला.
चीननेही त्यांचा सराव महिनाभरासाठी स्थगित केला होता; परंतु कावेबाजी करीत चीनने गलवान घाटी आणि पेंगोंग शो सरोवराजवळ असलेल्या परिसरात आपले सैनिक तैनात केले. सध्या गलवान परिसरात चीनचे ३,४०० तर पेंगोंग सरोवराजवळ ३,६०० सैनिक आहेत. यामुळे ओलीड आणि काराकोरम खिंडीतून लेहपर्यंत जाण्याचा भारताचा रस्ता बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील रस्ता मागच्या वर्षीच तयार करण्यात आला आहे. चीनची ही चाल लक्षात येताच भारतानेही परिसरात सैनिकांची हालचाल सुरू केली आहे.