बंगळुरु, दि. 15 - पत्रकार गौरी लंकेश यांना हत्या होण्यापूर्वी आपल्या मारेक-याचा चेहरा स्पष्टपणे दिसला होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येवेळी नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे फोटो काढले आहेत. फोटो पाहत असताना विशेष तपास पथकाला गौरी लंकेश यांनी मारेक-याचा चेहरा पाहिल्याचं दिसत आहे.
'गौरी लंकेश गेट उघडून घराच्या दिशेने जात असताना हल्लेखोराने त्यांना आवाज दिला. यानंतर गौरी लंकेश हल्लेखोराच्या दिशेने चालत गेल्या. गौरी लंकेश जवळ येताच हल्लेखोराने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली', अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 'तिसरी गोळी लागल्यानंतरही गौरी लंकेश 30 ते 60 सेकंदासाठी जिवंत होत्या', असंही सुत्रांकडून कळलं आहे.
‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.
गौरी लंकेश आणि कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अजून एक समान धागा असल्याचंही फॉरेन्सिकच्या अहवालात निष्पन्न झालं आहे. गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल एकाच बनावटीचं असल्याचं फॉरेन्सिकच्या प्राथमिक चाचणीत समोर आलं आहे. दोघांच्या हत्येसाठी 7.65 मिमी देशी बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आलं होतं. फॉरेन्सिकने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन बुलेट्स आणि काडतुसं ताब्यात घेतली होती.
तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांवर असणा-या बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना कलबुर्गी यांच्या हत्येवेळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांशी केली. या दोन्ही हत्यांमध्ये संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. चाचणीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्यांमध्ये एकाच बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आल्याचं नक्की झालं आहे. यामुळे या दोन्ही हत्यांमागे समान लोक सामील असण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.