बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी के. टी. नवीनकुमार याने आपण ज्येष्ठ कन्नड लेखक व रॅशनलिस्ट प्रा. के. एस. भगवान यांनाही मारण्याचा कट रचला होता, असे सांगण्यात येत आहे. त्यानेच पोलिसांना दिलेल्या जबानीत याचा उल्लेख केल्याचे समजते.प्रा. के. ए. भगवान हे पुरोगामी लेखक म्हणून ओळखले जातात. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. नवीनकुमार याच्या फोनचा रेकॉर्डही पोलिसांनी मिळवला असून, त्यातील संभाषणात प्रा. भगवान यांच्या हत्येचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गौरी शंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अमोल काळे याचा डॉ. कलबुर्गी हत्येमध्येही सहभाग होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे येत आहे. कलबुर्गी यांच्या घरी जे दोन मारेकरी गेले होते, त्यातही अमोल काळे होता, अशी पोलिसांची माहिती आहे. कलबुर्गी यांच्या घरातील एकाने अमोल काळे याला ओळखले आहे. अमोल काळे हा चिंचवडमधील रहिवासी आहे.पोलिसांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणी अमोल काळे, अमित डेगवेकर, मनोहर अडवे आणि सुजीतकुमार उर्फ प्रवीण अशा चार जणांना अटक केली आहे. नवीनकुमार याच्याप्रमाणेच हे चौघेही सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. नवीनकुमार याचे श्रीराम सेने या संघटनेचा संस्थापक प्रमोद मुतालिक याच्याशीही संबंध आहेत आणि त्याने मंगळूरमध्ये मुतालिक याची भेट घेतली होती, असेही आतापर्यंतच्या पोलीस तपासात आढळून आले आहे. (वृत्तसंस्था)
गौरी लंकेशचे मारेकरी करणार होते प्रा. भगवान यांचीही हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:10 AM