बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात विशेष तपास पथकानं आणखी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या संशयित आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकानं आज सिंधगीमधून एका संशयित आरोपीला अटक केली. परशुराम वाघमारे असं या आरोपीचं नाव आहे. कोर्टानं परशुरामला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या मारेकऱ्यांच्या हालचालीच्या कैद झाल्या होत्या. मारेकऱ्यांना दोनवेळा गौरी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती, असं सीसीटीव्हीत दिसलं होतं. दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 वाजता हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती. रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी लंकेश घरी आल्या. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला.
गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणात आणखी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 8:09 PM