गौरी लंकेश हत्या प्रकरणी चार संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 03:19 PM2018-06-02T15:19:07+5:302018-06-02T15:19:07+5:30
कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाची कारवाई
मुंबई: पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी खोट्या नावांसह अनेक सिम कार्ड्स आणि मोबाईल फोन्सचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकानं चौघांना अटक केली आहे. यातील एकाला चिंचवडमधून अटक करण्यात आली आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी त्यांची ओळख उघड होऊ नये, यासाठी मोठी काळजी घेतली होती, असं तपासातून समोर आलं आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे चौघे एका कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. त्यांना काल कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अटक केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये सुजीत कुमार उर्फ प्रवीण उर्फ मंजुनाथ याचा समावेश आहे. तो उडुपीचा रहिवासी आहे. याशिवाय अमोल काळे उर्फ भाईसाब (वय 37, पुणे), अमित देगवेकर उर्फ अमित (वय 38, फोंडा, गोवा) आणि मनोहर इडवे उर्फ मनोज (वय 28, विजयपुरा, कर्नाटक) यांनाही अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी काळे आणि देगवेकर गोवास्थित सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याची माहिती पुढे येत आहे. पुण्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यात काळेचा सहभाग होता. तर देगवेकरनं सनातन संस्थेत काम केलं आहे. याशिवाय तो मालगोंडा पाटीलसोबत वास्तव्यास होता. 2009 मध्ये गोव्यातील मडगावमध्ये झालेल्या स्फोटात पाटीलाचा मृत्यू झाला. बॉम्ब ठेवत असताना त्याच्या स्फोट झाल्यानं पाटीलचा मृत्यू झाला.