बंगळुरु - प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन मुख्य संशयित आरोपींचे स्केच जारी केले आहेत. याशिवाय अजून महत्वाची माहिती हाती लागल्याचे संकेतही एसआयटीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत. एसआयटीचे प्रमुख बी के सिंग यांनी यावेळी सांगितलं की, 'स्थानिकांनी आणि तांत्रिक विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही दोन पुरुष संशयितांची ओळख पटवली आहे. त्यांचे स्केच तयार करण्यात आले आहेत'. एसआयटीकडून आतापर्यंत 200 ते 250 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
'हत्या करण्यापुर्वी संशयित आरोपींनी शहरात जवळपास एक आठवडा मुक्काम केला. यावेळी त्यांनी गौरी लंकेश यांच्या घरावर नजर ठेवली. लोकांना आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे. जर हे संशयित त्यांच्या परिसरात राहिले असतील, तर त्यांनी आम्हाला माहिती द्यावी', असं आवाहन बी के सिंग यांनी केलं आहे. संशयित म्हणून दोघे असल्याची माहिती मिळाली असली, तरी माहितीच्या आधारे तीन स्केच काढण्यात आले आहेत.
'आम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही. लोकांनी आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे', असं बी के सिंग बोलले आहेत. हे दोघेही संशयित 25 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत. आम्ही त्यांच्या बाइकची माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बी के सिंग यांनी सांगितलं आहे.
यावेळी बी के सिंग यांनी कलबुर्गी प्रकरणातही स्केच जारी करण्यात आले होते, मात्र अटक झाली नाही असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'जर तुम्ही कलबुर्गी आणि या हत्येमधील संशयितांचे स्केट पाहिलेत, तर घेतलेली मेहनत लक्षात येईल. एका स्केचसाठी जवळपास 48 तास लागले आहेत. हे कॉम्प्यूटरच्या सहाय्याने तयार केलेले नाहीत'.
यावेळी बी के सिंग यांनी सनातन संस्थेचा हत्येत सहभागी असल्याचं वृत्त फेटाळून लावलं. 'गौरी लंकेश हत्येत सनातन संस्थेचा संबंध असल्याची माहिती फक्त प्रसारमाध्यमांकडे आहे, आमच्या बाजूने कोणत्याही संघटनेचा अद्याप उल्लेख झालेला नाही', असं बी के सिंग यांनी स्पष्ट केलं.
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.