गौरी लंकेश हत्येचा संशय सनातनवरच, पाच जणांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:47 AM2017-10-07T04:47:42+5:302017-10-07T04:48:03+5:30
गौली लंकेश हत्या प्रकरणात धागेदोरे हाती लागल्याचा दावा कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वीच केला होता.
बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात संशयाची सुई पुन्हा एकदा सनातनच्या व्यक्तींकडे वळली आहे. प्रवीण लिमकर, (३४, कोल्हापूर), जयप्रकाश उर्फ अण्णा, (४५, मंगलौर), सारंग अकोलकर (३८, पुणे), रुद्र पाटील (३७, सांगली) आणि विनय पवार, (३२, सातारा) अशी या पाच संशयितांची नावे आहेत.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. विशेष म्हणजे यातील चार संशयितांविरुद्ध २००९च्या मडगाव स्फोट प्रकरणात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. यातील रुद्र पाटील, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचे नाव नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून समोर आलेले आहे. दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी झाली होती. त्याआधी १९ आॅक्टोबर २००९ रोजी गोव्यात मडगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने या चार जणांचे नाव या प्रकरणाशी जोडलेले आहे.
सूत्रांनी सांगितले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात तपास संस्थांचा या पाच जणांवर संशय आहे. सनातन संस्थेच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी असा दावा केला होता की, या व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने आरोपी म्हणून सादर केले जाऊ शकते, म्हणून ते फरार आहेत. कलबुर्गी, पानसरे यांची हत्या एकाच पद्धतीच्या बंदुकीने झाली असल्याचे यापूर्वीच तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कर्नाटक एसआयटीने असा दावा केला आहे की, तपासात चांगली प्रगती आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, गौरी लंकेश प्रकरणात विशेष तपास पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
गौरी लंकेश यांना जागतिक पातळीवरील अॅना पोलित्स्काया पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार दिला जातो. अॅना पोलित्स्काया या रशियन पत्रकार होत्या. रशियातील भ्रष्टाचार, गैरकारभाराचे त्यांनी पत्रकारितेद्वारे वाभाडे काढले होते.
त्यांची वयाच्या ४८व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्कारासाठी प्रथमच भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे. अॅना पोलित्स्काया यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांचीही
गोळ्या झाडून हत्या झाली.