नवी दिल्ली - जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेहीपोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. यावरुन दिल्लीचे खासदार गौतम गंभीरनेही पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. मात्र, 'अवांछित तत्व' हिंसा करतील, तर पोलिसांकडून प्रत्युत्तर मिळेलच, असेही गंभीरने म्हटले आहे.
गौतम गंभीर म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे चुकीचेच आहे. पण, आत्मसुरक्षेसाठी काही झालंय, तर त्यात गैर काहीच नाही. जर तुम्ही दगडं माराल, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कराल, जाळपोळ कराल, तर पोलिसांकडून प्रत्युत्तर मिळणार, कारवाई होणारच. जर तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केले, तर काहीच अडचण नाही, तुमच्याकडे तो अधिकार आहे, असे गंभीरने म्हटले. आपण आपली समस्या मांडलीच पाहिजे, त्याचं निराकरण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि भविष्यातही ती राहिन, असेही गौतमने म्हटले आहे.
पोलिसांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप जामियाच्या विद्यार्थ्यांनी केला होता. जामिया विद्यापीठातील आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला. देशातील विविध विद्यापीठात आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला. तसेच, भाजपा सरकार पोलिसांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
दरम्यान जामिया विद्यापीठातील घटनास्थळावर एक काडतूस सापडल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली होती. मात्र, पोलिसांकडून गोळीबार झाल्याचा आरोप त्यानं फेटाळला. पोलिसांकडे रबराच्या गोळ्यादेखील नव्हत्या, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. रविवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी एक बस पेटवून देण्यात आली. यानंतर पोलिसांनी पूर्वपरवानगीशिवाय विद्यापीठ परिसरात प्रवेश करुन कारवाई केली. पोलिसांनी जामिया हिंसाचार प्रकरणात 10 जणांना अटक केली होती. यामधील एकही जण विद्यार्थी नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी आम आदमी पार्टीचा एक आमदार आणि काही इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.