गावपातळीपासून करणार पक्षबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:12 AM2018-02-20T03:12:12+5:302018-02-20T03:12:30+5:30
देशभरात भाजपा सरकारविरोधात जनमत तयार होत असून जनतेचा केंद्र सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे. सत्तेवर येण्यासाठी भाजपाने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत
नवी दिल्ली : देशभरात भाजपा सरकारविरोधात जनमत तयार होत असून जनतेचा केंद्र सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे. सत्तेवर येण्यासाठी भाजपाने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. परिणामी गुजरात विधानसभेसह नंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची पीछेहाट सुरू झाली आहे. काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच मी व काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी अगदी गावपातळीपासूनच पक्षबांधणीचे काम वेगाने सुरू केले आहे. मीही लवकरच देशभर दौरा करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिली.
लोकमत मीडियाचे चेअरमन व माजी खा. विजय दर्डा तसेच लोकमत संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी खा. राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी महाराष्टÑातील व देशातील राजकारणाविषयी विस्ताराने चर्चा झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यात अनेक विषयांना खा. गांधी यांनी स्पर्श केला आणि आपली मते मनमोकळेपणाने मांडली.
मला लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी चर्चा करायला आवडते. पण इच्छा असूनही सुरक्षारक्षकांच्या बंधनांमुळे ते मला करता येत नाही, याचे सतत वाईट वाटत राहते. पण मी सोशल मीडियाद्वारे सतत त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही लोकांमध्ये मिसळून, सोशल मीडियाद्वारे जनतेशी सतत संपर्क ठेवायला हवा असा माझा आग्रह असतो आणि अनेकांनी त्या दृष्टीने कामही सुरू केले आहे, असे खा. गांधी या वेळी म्हणाले. या वेळी राहुल गांधी यांच्याशी शेतकºयांचे प्रश्न, छोटे व्यापारी, जीएसटीनंतर व्यापाºयांतील अस्वस्थता, कारखानदार व कामगारांच्या समस्या, बेरोजगारी तसेच माध्यमांसमोरची आव्हाने आदी विषयांवर या वेळी चर्चा झाल्याचे खा. विजय दर्डा यांनी सांगितले. या भेटीत खा. राहुल गांधी अधिक आक्रमक व पक्षवाढीसाठी झपाटलेले दिसले. त्यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास जाणवत होता, असेही दर्डा म्हणाले.