कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडलं; तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.पी. मलिकांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:53 AM2019-12-14T10:53:53+5:302019-12-14T10:57:40+5:30
भारताचं जितकं शोषण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न या देशांनी केला.
चंदीगड - कारगिल युद्धाच्या २० वर्षानंतर याच्याशी जोडले गेलेले अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी दावा केला आहे की, कारगिल युद्धावेळीभारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी प्रचंड पैसा उकळला आणि ३ वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले होते.
जनरल मलिक हे मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, कारगिल युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याची नितांत गरज होती. त्यामुळे इतर देशाकडून आपण ही मागणी केली. त्यावेळी या देशांनी भारताला मदतीच्या नावावर जुनी झालेली शस्त्र सोपविली. भारताचं जितकं शोषण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न या देशांनी केला. आम्ही एका देशाकडून तोफा मागितल्या होत्या. त्या देशाने सुरुवातील तोफा देण्याचं आश्वासन दिलं पण नंतर जुन्या तोफांची दुरुस्ती करुन भारताला पाठविल्या असं त्यांनी सांगितले.
तसेच दारुगोळाची गरज असताना भारताने अन्य एका देशाची संपर्क साधला असता त्यांनी १९७० च्या दशकातील दारुगोळा भारताला दिला होता. त्याचसोबत सॅटेलाइट फोटोसाठी भारताला प्रत्येकी ३६ हजार रुपये द्यावे लागले होते. इतके पैसे देऊनही भारताला ३ वर्ष जुने सॅटेलाइट फोटो देण्यात आले होते असा खुलासा जनरल व्ही.पी. मलिक यांनी केला आहे.