नवी दिली : संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जातात. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारकडून ई-श्रम कार्ड दिले जाते. यासाठी सरकारने ई-श्रम पोर्टलही सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे कामगारांना अनेक योजनांचे लाभ दिले जातात. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही हे कार्ड काढता येते.
काय आहेत पात्रतेचे निकष?असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेली कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. १६ ते ५९ या वयोगटातील कामगार स्वत:चा वैध मोबाइल नंबर असावा. आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंक केलेला असावा. बँकेमध्ये बचत खाते आवश्यक.
कार्डामुळे होणारे फायदे मृत्यू आल्यास कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य.काही कारणास्तव आंशिक अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३,००० रुपये इतके मासिक पेन्शन मिळते.
कार्डासाठी नोंदणी कशी करावी? ई-श्रम पोर्टलवर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज भरता येतो.
सर्वप्रथम ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा. सेल्फ रजिस्ट्रेशन या मेन्यूवर क्लिक करा. आधार कार्डशी जोडलेला मोबाइल नंबर टाकून कॅप्चा कोड देऊन ओटीपी मागवा. ओटीपी नंबर टाकून पडताळणी पूर्ण करा. आलेल्या पानावर पत्ता, शिक्षण, कौशल्ये आदी माहिती भरा. यानंतर बँक खात्याचा तपशील भरा. सर्व माहिती भरल्यानंतर प्रीव्ह्यू करा. नंतर सबमिट बटण क्लिक करा. यात नंतर तुम्हाला पुन्हा एक ओटीपी पाठवला जाईल. तो टाइप करून तुमच्या माहितीची पडताळणी पूर्ण करा. पुढच्या पानावर तुमचे ई-श्रम कार्ड दिसेल. डाउनलोड बटण दाबून ते सेव्ह करा. त्याची प्रिंट काढून घ्या. अधिक माहितीसाठी १४४३४ या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.