'सकाळी उठून आधी राष्ट्रगीत गायचं', राजस्थान सरकारचा हॉस्टेल विद्यार्थ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:51 AM2017-11-28T10:51:07+5:302017-11-28T20:31:39+5:30
राजस्थानमध्ये आता हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज राष्ट्रगीत गावं लागणार आहे. राज्य सरकारने असा आदेशच जारी केला आहे.
जयपूर - राजस्थानमध्ये आता हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज राष्ट्रगीत गावं लागणार आहे. राज्य सरकारने असा आदेशच जारी केला आहे. राजस्थानच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने आदेश जारी करताना सांगितलं आहे की, राज्यभरातील 800 सरकारी हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावं लागणार आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल असं विभागाचे संचालक समित शर्मा यांनी सांगितलं आहे.
'निवासी शाळांमध्ये रोज राष्ट्रगीत गायलं जायचं आणि आता ही परंपरा सरकारद्वारा आणि सरकारच्या मदतीने चालवण्यात येणा-या हॉस्टेल्समध्ये सुरु करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना वाढण्यास मदत मिळेल', असं समित शर्मा म्हणाले आहेत. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज सकाळी सात वाजता प्रार्थनेसोबत राष्ट्रगीतही गावं लागणार आहे. राजस्थानमध्ये जयपूर महापालिका कर्मचा-यांना याआधीच रोज राष्ट्रगीत गाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
महापालिकेने आदेश दिला होता की, सकाळच्या वेळी राष्ट्रीय गाणं आणि संध्याकाळी राष्ट्रगीत गावं लागेल. 'हा आदेश जारी करण्यामागे एकमेव उद्देश होता तो म्हणजे कर्मचा-यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि काम करण्यासाठी उत्तम वाचावरण निर्माण व्हावं', अशी माहिती महापालिका अधिका-यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त अशोक लाहोती यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना म्हटलं होतं की, दिवसाची सुरुवात राष्ट्रीय गीत आणि शेवट राष्ट्रगीताने व्हावा यापेक्षा दुसरी उत्तम गोष्ट नाही. यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते.
यासोबत त्यांनी म्हटलं होतं की, जर एखाद्याला राष्ट्रगीत गायचं नसेल तर त्या व्यक्तीने पाकिस्तानात जावं. 'मी महापालिकेत काम करतो, त्यामुळे मी महापालिकेला विरोध केला तर त्याचं समर्थन नाही. ज्या देशात आपण राहतो, त्याच देशाच्या राष्ट्रगीताला जर कोणी विरोध करत असेल तर जरुर करावा. तुम्हाला कोणी थांबवत नाही. पण मग तुम्ही पाकिस्तानात निघून जावं', असं अशोक लाहोती बोलले होते. मात्र नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन पलटी मारली होती आणि सांगितलं होतं की, 'ज्याच्या मनात देशासाठी सन्मान आहे, तो स्वत:हून उभा राहिल. आमचा कोणतही अजेंडा नाही'.