भयंकर! घरामध्ये सुरू असलेल्या टीव्हीचा अचानक झाला ब्लास्ट; एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 11:26 AM2022-10-05T11:26:32+5:302022-10-05T11:27:22+5:30
घरामध्ये सुरू असलेल्या एलईडी टीव्हीचा अचानक ब्लास्ट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये टीव्ही पाहताना भयंकर दुर्घटना घडली आहे. घरामध्ये सुरू असलेल्या एलईडी टीव्हीचा अचानक ब्लास्ट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ओमेंद्र असं मृत्यू झालेल्या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष विहारमध्ये ऑटो ड्रायव्हर निरंजन आपल्या कुटुंबासोबत राहतात. 17 वर्षांचा ओमेंद्र घरात आपला मित्र करणसोबत टीव्ही पाहत होता. त्याच्या घरात एलईडी टीव्ही होता. दोघं जण टीव्ही पाहत असताना थोड्या वेळाने ओमेंद्रची आई ओमवतीही तिथं आली आणि तिघं एकत्र बसून टीव्ही पाहू लागले. यानंतर अचानक एलईडी टीव्हीमध्ये ब्लास्ट झाला.
ब्लास्ट आवाज इतका मोठा होता की शेजारील लोकही घाबरून घरातून बाहेर धावत आले. संपूर्ण घर धुराने भरलं होतं. घराची भिंतही तुटली होती. घरात ओमेंद्र, करण आणि ओमवती तिघंही गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान ओमेंद्रचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.
ओमेंद्रचा मित्र आणि आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. शहराचे एसपी ज्ञानेंग्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या कारणांचा तपास केला जातो आहे. हाय व्होल्टेजमुळे एलईडी टीव्ही फुटला असावा अशी शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"