दामोह : लग्नाच्या वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना नुकतीच मध्य प्रदेशातील दमोहमध्ये घडली. नंदरई पथरिया गावातील चिमुरडीला विंचू चावला होता. उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात नेले जात होते, पण लग्नाच्या वरातीमुळे रुग्णवाहिका अर्धा तास रस्त्यावर अडकून पडली आणि मुलीचा मृत्यू झाला.भूमी विश्वकर्मा या चिमुरडीला विषारी विंचू चावला. आधी तिला आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. दीड वर्षाच्या भूमीसाठी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. तिने ३२ किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पार केले, पण जिल्हा रुग्णालयात पोहोचण्याच्या अर्धा किलोमीटर आधी वरातीच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली.रुग्णवाहिका चालक व मुलीचे वडील यांनी वरातीतील लोकांना रस्ता देण्यासाठी विनंती केली. त्यासाठी ते सुमारे २५ मिनिटे प्रयत्न करीत होते. अखेर दुभाजकावरून चालकाने रुग्णवाहिका पुढे काढली आणि भूमीला रुग्णालयात पोहोचविले, पण रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी भूमीला मृत घोषित केले. (वृत्तसंस्था)लोक वरातीमध्ये नाचण्यात इतके दंग होते की, त्यांना रुग्णवाहिकेत मृत्यूशी झुंज देणारी ती चिमुरडी दिसलीच नाही. भूमीच्या मृत्यूला हे लोकच कारणीभूत ठरले. पोलीस अधीक्षक विवेक अग्रवाल म्हणाले की, ही अतिशय दु:खद घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.
वरातीमुळे गेला मुलीचा जीव, मध्य प्रदेशातील घटना; रुग्णवाहिकेला दिला नाही रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:34 AM