प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:02 PM2019-03-18T15:02:01+5:302019-03-18T15:06:31+5:30
प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने 40 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे.
प्रयागराज - उत्तरप्रदेशातील प्रयागराजपासून वाराणसी पर्यंत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची गंगा यात्रा सुरु झाली आहे. प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसने प्रथमच राजकारणात मोठी जबाबदारी टाकली आहे. प्रियंका गांधी यांना राजकारणात आणल्यापासून त्यांची तूलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी होऊ लागली आहे. प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह निर्माण करण्यात आला. प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने एक फोटो शेअर केला आहे.
परम्पराएं, रीति-रिवाज़ कभी नहीं बदलते। pic.twitter.com/Rk2TEvcuF2
— UP Congress (@INCUttarPradesh) March 18, 2019
प्रियंका गांधी यांनी प्रयागराज येथे गंगा यात्रेची सुरुवात करण्याआधी प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. मात्र प्रियंका गांधी यांनी केलेल्या पूजेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी 40 वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली. उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट करत फोटो शेअर केला आहे त्यामध्ये एकीकडे प्रियंका गांधी तर दुसरीकडे इंदिरा गांधी यांचा फोटो आहे.
या ट्विटमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसकडून लिहण्यात आलं आहे की, रुढी आणि परंपरा कधीच बदलत नसतात, काँग्रेसने इंदिरा गांधी यांचा हनुमानाची पूजा करतानाचा फोटो टाकलेला आहे. हा फोटो 25 सप्टेंबर 1979 रोजी काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज प्रयागराज येथे प्रियंका गांधी यांनी हनुमानाची पूजा केल्याचा फोटो आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून प्रियंका गांधी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केलेली आहे. त्यासाठी प्रियंका नही ये आंधी है, दुसरी इंदिरा गांधी है अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रॅलीमध्ये दिल्या जातात.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरूवात झाली आहे. या यात्रेची सुरुवात करण्यासाठी रविवारी संध्याकाळीच प्रियंका गांधी प्रयागराजमध्ये पोहचल्या होत्या. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे. हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं. त्यानंतर बोटीमध्ये बसून प्रियंका गांधी पुढील यात्रेसाठी निघाल्या. सुरक्षेचे कवच भेदत प्रियंका गांधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन संवाद साधत होत्या. याआधीही त्यांनी प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये रॅली काढली आहे.