गोव्याचा अर्थसंकल्प पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच; चार दिवस चालणार अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 12:27 PM2018-02-19T12:27:41+5:302018-02-19T12:27:51+5:30
सुदीन ढवळीकर यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी
गोवा विधानसभेचा यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीशिवाय मांडण्याचा निर्णय सोमवारी भाजपा नेत्यांकडून घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मनोहर पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगत मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. ते येत्या 22 फेब्रुवारीला विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडतील. त्यानंतर ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतील, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांची प्रकृती सुधारत असली तरी ते आजारातून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यामुळेच भाजपा नेत्यांच्या आजच्या बैठकीत पर्रीकरांच्या अनुपस्थितीतच अर्थसंकल्प विधानसभेच्या पटलावर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणखी चार दिवस चालणार आहे. या काळात सार्वजानिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर सभागृह नेतेपदाची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती भाजपा नेत्यांकडून देण्यात आली.
दरम्यानच्या काळात पर्रीकर यांच्या स्वादूपिंडाला (पॅनक्रिया) सूज आल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आले. परंतु लिलावती इस्पितळाने यावर अधिकृतरित्या कोणतेच भाष्य केलेले नाही किंवा पत्रक जारी केले नव्हते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमानंतर पर्रिकर यांना भेटायला लीलावती रुग्णालयात गेले होते.
तत्पूर्वी पर्रीकर यांची गोव्यातील काही मंत्र्यांनी, भाजपा पदाधिका-यांनी मुंबईत भेट घेतली आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत हे पाटणा येथे होते. दूरध्वनीवरून शनिवारी मुख्यमंत्री सभापती सावंत यांच्याशी बोलले. अर्थसंकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. त्याविषयी दूरध्वनीवरून काही वरिष्ठ प्रशासकीय अधिका:यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती.