एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 04:31 PM2018-07-03T16:31:26+5:302018-07-03T16:31:57+5:30

केवळ एक रुपयाच्या थकबाकीसाठी ग्राहकाचे तारण ठेवलेले लाखो रुपयांचे सोने बँकेने जप्त केले.

gold seized by the bank for recovery of one rupee loan | एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने

एक रुपयाच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केले लाखोंचे सोने

Next

चेन्नई - कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तगादा लावल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मोठमोठ्या उद्योगपतींच्या कोट्यवधीच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँका पै पै ची थकबाकी वसूल करण्यासाठी सर्वसामान्यांवर जप्तीची कारवाई करतात. असाच एक धक्कादायक प्रकार तामिळनाडूमधील एका शहरात समोर आला आहे. येथे केवळ एक रुपयाच्या थकबाकीसाठी ग्राहकाचे तारण ठेवलेले लाखो रुपयांचे सोने बँकेने जप्त केले. या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला असून, प्रकरण आता हायकोर्टात पोहोचले आहे. 
 कांचीपुरम येथील एका सहकारी बँकेने एका कर्जदाराला एक रुपयाचा थकबाकीदार घोषित केले. तसेच त्याने गहाण ठेवलेले सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे १६९ ग्रॅंम सोने जप्त केले. सी. कुमार असे या थकबाकीदाराचे नाव आहे. सी. कुमार हे थकलेला रुपया परत करण्यास तयार नव्हते असेही नाही. मात्र बँकेच्या आडमुठ्या वर्तनामुळे आता त्यांनी कोर्टाचा दकवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल आहे. 
 कांचीपुरम को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सी. कुमार यांनी ६ एप्रिल २०१० रोजी ३१ ग्रॅम सोने गहाण ठेवून १ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २८ मार्च २०११ रोजी त्यांनी संपूर्ण कर्ज व्याजासह बँकेला परत केले. पण या कर्जापैकी एक रुपया जमा करण्याचे राहून गेल्याचे बँकेच्या रेकॉर्डमध्ये नमुद झाले. त्यानंतर सी. कुमार यांनी ९ फेब्रुवारी २०११ रोजी ८५ ग्रॅम सोने गहाण ठेवून १.०५ लाख रुपये आणि २८ फेब्रुवारी २०११ रोजी ५२ ग्रॅम सोने गहाण ठेवून ६० हजार रुपये कर्जाऊ घेतले. काही काळाने सी. कुमार यांनी या दोन्ही कर्जांची परतफेड केली. मात्र एक रुपयाच्या शिलकीसह कर्ज खाते चालू राहिले.  
दरम्यान, सी. कुमार यांनी थकीत एक रुपया परत घेऊन दागिने परत करण्याची बँकेला वारंवार विनंती केल्याचे कुमार यांचे वकील एम. साथयान यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनीसुद्धा बँकेवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र बँकेने अद्याप दागिने परत केलेले नाहीत. त्यामुळे कुमार यांना आपल्या दागिन्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत असून, त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.  गेल्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली असून, न्यायमूर्ती टी. राजा यांनी सरकारी वकिलाला या प्रकरणात माहिती देण्यास सांगितले आहे.  

Web Title: gold seized by the bank for recovery of one rupee loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.