थिरुवनंतपुरम : विदेशी मुत्सद्यांच्या कार्गो चॅनलच्या माध्यमातून होणाऱ्या सोने तस्करी प्रकरणात केरळच्या आयटी विभागाच्या एका अधिकारी महिलेचे नाव आल्यानंतर केरळ सरकारने मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचे प्रधान सचिव तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांना हटविले आहे. त्यांच्या जागी मीर मुहंमद अली यांची नेमणूक करण्यात आली आहे.‘केरला स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (केएसआयटीआयएल) या सरकारी कंपनीच्या व्यवस्थापक राहिलेल्या स्वप्ना सुरेश या महिलेचा सोने तस्करीशी संबंध असल्याचे आढळून आल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या तस्करीशी मुख्यमंत्री कार्यालयाचा (सीएमओ) संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, ‘स्वप्ना सुरेश यांची नेमणूक कुठल्या परिस्थितीत झाली, याची मला कल्पना नाही. या नेमणुकीला माझी सहमती नव्हती.’शिवशंकर हे राज्याचे आयटी सचिव आणि ‘केएसआयटीआयएल’चे चेअरमन आहेत. तस्करी प्रकरणात नाव आल्यानंतर स्वप्ना सुरेश हिची सेवा खंडीत करण्यात आली आहे.
सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:45 AM