नवी दिल्ली - शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेला मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे. गतवर्षीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तसेच आपल्या नियमित वेळापत्रकापेक्षा तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत केरळच्या सीमेपर्यंत धडक मारली होती. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला असून, मंगळवारी मान्सून केरळमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, मान्सूनची घोडदौड अशीच सुरू राहिली तर पुढील आठवडाभरात मान्सून कोकणासह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून दि. २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. मान्सून दरवर्षी सर्वसाधारणपणे दि. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तर अंदमानमध्ये दाखल होण्याची तारीख २० मे आहे. परंतु, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते़. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याने वेगाने वाटचाल केली. भारतीय हवामान विभागाकडून मागील काही वर्षांत जाहीर केलेला मान्सूनचा अंदाज खरा ठरला आहे. केवळ २०१५ मध्ये हा अंदाज चुकला होता. यावेळी विभागाने दि. ३० मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते. पण त्यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिराने दि. ५ जून रोजी झाले होते. मागील वर्षी दि. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. तसेच हवामान विभागानेही ३० मे हा अंदाज व्यक्त केला होता. तर २०१३, २०१४ व २०१६ च्या अंदाजात केवळ १-२ दिवसांचा फरक होता.
महाराष्ट्रात वेळेवर मान्सून दाखल होणार- डॉ. ए के श्रीवास्तवकेरळमध्ये मान्सूनने वेळे अगोदर आगमन केले असून सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कर्नाटकात येत्या 2 दिवसात असून दाखल होईल. महाराष्ट्रात वेळेवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.