लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेका कंपनी विकसित करीत असलेल्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचे १० कोटी डोस येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत भारताला मिळणार आहेत. त्यांचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार असल्याची माहिती या कंपनीचे सीइओ अदर पुनावाला यांनी दिली.
कोविशिल्ड ही लस कोरोनाला परिणामकारपणे प्रतिबंध करू शकते यावर अंतिम टप्प्यातील चाचण्यांत शिक्कामोर्तब झाले की, त्या लसीच्या आणखी मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला भारत तातडीने मंजूरी देण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरमध्येच देशात सर्व ठिकाणी एकाच वेळी लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू करता यावी याकरिता कोविशिल्डच्या १० कोटी डोसचे उत्पादन करण्यात येईल. या लसीचे १ अब्ज डोस बनविण्याचे लक्ष्य सिरम इन्स्टिट्यूटने ठेवले आहे.चाचण्यांचे निष्कर्ष उत्तमअॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लसीचे ४ कोटी डोस सिरम इन्स्टिट्यूटने गेल्या दोन महिन्यांत बनवून तयार ठेवले आहेत. त्याचप्रमाणे नोवॅवॅक्स या कंपनीच्या लसीचेही उत्पादन सुरु करण्याचा सिरम इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या दोन कंपन्यांच्या लसींचे इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ठेवणे ही जोखीम वाटत होती. पण या दोन्ही लसींचे आजवरच्या चाचण्यांतील निष्कर्ष उत्तम आहेत, असेही सिरम इन्स्टिट्यूटचे सीइओ अदर पुनावाला यांनी सांगितले.