उत्तर प्रदेशमध्ये 'मृत्यूचं रूग्णालय', ऑक्सिजन न मिळाल्याने 30 लहानग्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 07:29 PM2017-08-11T19:29:41+5:302017-08-11T23:47:44+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने येथे 30 लहानग्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
गोरखपूर, दि. 11 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने येथे 30 लहानग्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. ऑक्सिजन पुरवठा करणा-या कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्यामुळे ही घटना घडली. 69 लाख रूपये न भरल्याने ऑक्सिजन पुरवठा करणा-या कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा गुरूवारी रात्रीपासून थांबवला होता अशी प्राथमिक माहिती आहे.
बीआरडी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले होते. या द्वारे एन्सेफलायटीस वॉर्डसह शेकडो रुग्णांना नळीद्वारे ऑक्सिजन दिले जात होते. पैसे थकवल्याने गुरूवारी रात्रीपासून या रूग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला होता. ऑक्सिजन पुरवठा करणा-या फर्मचे 69 लाख रूपये न भरल्याने कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. तेव्हापासून जम्बो गॅस सिलेंडरच्या सहाय्याने रूग्णायलात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता. सुरुवातीला या दुर्घटनेत एकूण 22 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते. गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या दुर्घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या संख्येत वाढ होऊन ती 30 वर पोहोचली आहे. या ह्रदयद्रावक दुर्घटनेत नेमके किती बळी गेले याबाबत अजून अधिकृत आकडेवारी समजू न शकल्याने मृतांचा आकडा बदलू शकतो.
30 children lost their lives due to encephalitis in last 48 hours at Gorakhpur's BRD Hospital: District Magistrate, Rajeev Rautela pic.twitter.com/u5yRmZb86e
— ANI UP (@ANINewsUP) August 11, 2017