संसदीय व्यवस्थेवर सरकार हल्ले करतेय : सोनिया गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:50 AM2017-11-21T03:50:40+5:302017-11-21T03:51:01+5:30
नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे. मोदी सरकार अहंकारी असून त्याची सावली संसदीय लोकशाहीवर पडल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सरकारवर हल्ला चढवला.
त्या म्हणाल्या की, भ्रष्टाचार, मंत्र्यांकडून पदाचा होत असलेला दुरुपयोग आणि संरक्षण साहित्य खरेदीचे प्रश्न विचारले जातील व उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळेच सरकार संसदेलाच टाळत आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, सदोष जीएसटीसाठी मोदी अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवतात. परंतु, आज संसदेला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. बेकारी वाढत आहे, महागाईने कळस गाठला आहे, निर्यात घटली आहे व जीएसटीमुळे लोक त्रासून गेले आहेत. नोटाबंदीमुळे लोकांच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे. आमचे पंतप्रधान मोठ्या घोषणा करून खोट्या आश्वासनांनी लोकांनी फसवणूक करीत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मोदी यांच्या या उपायांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही.
>जेटली यांचे सोनियांना प्रत्युत्तर
सोनिया गांधी यांच्या या आरोपांना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर देताना २०११ मध्ये संसद अधिवेशनाला विलंब झाला होता कारण निवडणुकीच्या तारखा त्याचवेळी आल्या होत्या, असे म्हटले. निवडणुकांमुळे यापूर्वीही अनेकवेळा संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले गेले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा काँग्रेसचे खरे रूप उघड होईल, असे जेटली म्हणाले.