नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या(Petrol Diesel Price) वाढत्या किमतींवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर(Narendra Modi) टीका केली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून सरकारने लाखो कोटी रुपये कमावल्याचंही म्हटलं आहे.
प्रियांक गांधीनी ट्विट केलं की, 'जेव्हा तुम्ही दररोज महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा, मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या करातून 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. रोज महाग तेल-भाज्या विकत घेताना लक्षात ठेवा. या सरकारने 97% कुटुंबांचे उत्पन्न कमी केले पण मोदीजींचे अब्जोपती मित्र दररोज 1000 कोटी कमावत आहेत,' अशी खरमरीत टीका प्रियंका गांधी यांनी केली.
दरम्यान, गुरुवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि देशातील जनतेशी घृणास्पद चेष्टा सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल ट्विट केले, 'केंद्र सरकार देशातील नागरिकांशी घृणास्पद विनोद खेळत आहे.'
आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढपेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत.