जीडीपी 11 वर्षांतील निचांकावर राहण्याचा सरकारचा अंदाज; आरबीआयच्या आकड्यावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 08:30 PM2020-01-07T20:30:34+5:302020-01-07T20:32:07+5:30
आरबीआयने गेल्या महिन्यात वर्षाचा जीडीपी अंदाज 6.1 टक्क्यांवरून घटवून 5 टक्के करण्यात आला होता.
नवी दिल्ली : केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षातील (2019-20) जीडीपी वाढ 5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. हा दर 2008-9 नंतर सर्वात कमी असणार आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (सीएसओ)ने वार्षिक जीडीपी वाढीचा पहिला अंदाज आज जाहीर केला आहे. तो आरबीआयने लावलेल्या अंदाजाएवढाच आहे.
आरबीआयने गेल्या महिन्यात वर्षाचा जीडीपी अंदाज 6.1 टक्क्यांवरून घटवून 5 टक्के करण्यात आला होता. 2018-19 मध्ये वास्तविक वाढ 6.8% राहिली होती. मॅन्युफॅक्चरींग सेक्टरमध्ये ही वाढ 2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ही वाढ 6.9 टक्के होती. ग्रॉस व्हॅल्यू एडेड (जीव्हीए) वाढ 4.9 टक्के राहण्याची शक्यता आहे. ही वाढ गेल्या वर्षी 6.6 टक्के होती.
सीएसओ अर्थव्य़वस्थेला आठ हिश्शांमध्ये भागते आणि आकडे जाहीर करते. पहिला अंदाज वेगवेगळ्या सेक्टरच्या आठ महिन्यांच्या कामगिरीवर आधारलेला आहे. यामध्ये खासगी कंपन्यांच्या कामगिरीचा विचार केला जातो. सीएसओच्या आकड्यांच्या आधारावरच सरकार अर्थसंकल्प तयार करते. अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर जीडीपीचा दुसरा अंदाज वर्तविण्यात येतो.
चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा आकार 5 टक्के वाढीनुसार 147.79 लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 6.8 टक्के वाढीनुसार 140.78 लाख कोटी रुपये होता. तर खासगी गुंतवणूक दर्शविणारा ग्रॉस फिक्स्ड कैपिटल फॉर्मेशन 57.42 लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हा आकडा 55.70 लाख कोटी रुपये होता.