सरकार-शेतकऱ्यांमध्ये २ फेब्रुवारीला चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 05:53 AM2021-02-01T05:53:25+5:302021-02-01T07:43:35+5:30
Farmer News : शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली : शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत.
२२ जानेवारीला सरकार आणि संघटनांमध्ये चर्चेची १२ वी फेरी झाली. पण, सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याच्या प्रस्तावाशिवाय अन्य पाऊल उचलण्याची तयारी दाखविली नाही. हा प्रस्ताव फेटाळून कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने कोंडी ‘जैसे थे’ आहे. दरम्यान, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे शेतकरी ठिय्या देऊन आहेत. गाझीपूर सीमेवर चोख बंदोबस्तासह मोठ्या संख्येने कठडे उभारले असतांना इथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.