कृत्रिम लोणी विक्रीवर आता सरकारची पाळत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:26 AM2020-08-04T03:26:56+5:302020-08-04T03:27:26+5:30
गडकरी यांच्या पत्राची पीएमओने घेतली दखल
विकास झाडे
नवी दिल्ली : वनस्पती तेलापासून काढण्यात येणाऱ्या कृत्रिम लोण्यासंदर्भात लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून अशा उत्पादनावर बंदी घालण्याची विनंती केली. पीएमओने या पत्राची दखल घेत आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाºया भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरणास सूचना देऊन यावर नियमावली तयार करण्यास सांगितले आहे.
गडकरी यांनी पीएमओला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वनस्पती तेलापासून बनविण्यात येणारे नकली कृत्रिम लोणी आरोग्यास घातक ठरत आहे. जे शेतकरी गायीच्या दुधापासून लोणी तयार करतात त्याच्या व्यवसायासही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कृत्रिम लोण्यात चरबीचे प्रमाण अधिक आहे. शिवाय ग्राहकांना आपण काय खात आहोत, हेही कळायला मार्ग नसतो. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरण नवीन नियमावली तयार करीत आहे. आता जी नियमावली आहे त्यात या श्रेणीतील खाद्यपदार्थांमध्ये फॅट्समर्यादा केवळ ५ टक्के आहे. त्यात सुधारणा करून २०२१ पर्यंत ३ टक्के तर २०२२ पर्यंत २ टक्यांवर आणली जात आहे. याशिवाय एका विशेष चिन्हाचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे कृत्रिम लोण्याचा किती उपयोग करण्यात आला आहे, हे स्पष्ट होईल. हॉटेल्स, ढाबा, रेस्टॉरंट इथे कृत्रिम लोण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयोग केला जातो, नकली वस्तू वापरताना त्याची मूळ आवरणे नष्ट केली जातात. अशांवर आता सुरक्षा खाद्य विभाग पाळत ठेवणार असून धाडसत्रही सुरू होईल.