चंढीगड - राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे, केंद्र सरकारने आक्रमक पाऊलं उचलत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, पंजाब आणि हरयाणामध्येइंटरनेट बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मंदिरावर कर्णा म्हणजे स्पीकर लाऊन गावागातील शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचं काम केलंय.
शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे, सरकारने इंटरनेट बंद केले असले तरी, आपल्या कल्पतेतून हरयाणातील शेतकऱ्यांनी गुरुद्वारा आणि मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरवरुन आपला संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील मंदिराबाहेर लाऊडस्पीकर ऐकण्यासाठी शेतकरी जमा होत आहेत. जिंद जिल्ह्यातील 17 खाप पंचायतीच्या प्रमुखांनी मंदिराच्या लाऊडस्पीकवरुन लोकांपर्यंत संदेश पोहविण्याच्या कामाला गती दिली आहे. तसेच, आंदोलनासंदर्भात सूचना आणि रणनितीही आखण्यात या लाऊडस्पीकरचा मोठा उपयोग होत आहे. त्यामुळेच, शेतकऱ्यांसारखा जुगाड कुणीही करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील 17 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे. केवळ मोबाईल रिचार्ज आणि बँकींग व्यवहार सोडून सर्व एसएमएस सर्व्हीस 31 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
2 फेब्रुवारीला होणार चर्चेची दुसरी फेरी
शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत. २२ जानेवारीला सरकार आणि संघटनांमध्ये चर्चेची १२ वी फेरी झाली. पण, सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याच्या प्रस्तावाशिवाय अन्य पाऊल उचलण्याची तयारी दाखविली नाही. हा प्रस्ताव फेटाळून कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने कोंडी ‘जैसे थे’आहे.