आठवं आश्चर्य... मोदी सरकारच्या निर्णयाचं चक्क पाकिस्तानकडून कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 04:27 PM2018-11-22T16:27:26+5:302018-11-22T16:27:48+5:30
शिखांचं प्रेरणास्थान असलेल्या गुरुनानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे.
चंदिगड- शिखांचं प्रेरणास्थान असलेल्या गुरुनानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार करतारपूर साहिब कॉरिडोर उभारणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानचा दौरा करून आल्यानंतर करतारपूर साहिब कॉरिडोरची जोरदार चर्चा होती.
केंद्र सरकार गुरुदासपूर जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडोरचं निर्माण करणार आहे. जिथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कॉरिडोरच्या माध्यमातून लोकांना करतारपूर साहिब जाण्यास मदत होणार आहे. भारतानं पाकिस्तान सरकारलाही त्याच्या क्षेत्रातील भागात सुविधा पुरवण्याचं आवाहन केलं आहे.
तसेच पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यात येणाऱ्या सुलतानपूर लोधी शहराचं स्मार्ट सिटीत रुपांतर करण्यात येणार आहे. या शहराला 'पिंड बाबे नानक दा' या नावानंही ओळखलं जातं. तसेच अमृतसरमध्येही गुरुनानक युनिव्हर्सिटी बनवण्यात येणार आहे. जेथे धर्माशी निगडित अभ्यास शिकवण्यात येणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयही गुरुनानक देवशी संबंधित स्टेशनांवर विशेष ट्रेन चालवणार आहे.
पाकिस्तानही करणार कॉरिडोरचं निर्माण
पाकिस्ताननंही या महिन्यात कॉरिडोर बनवण्याचं काम सुरू करणार आहे. इम्रान खान स्वतः याचं भूमिपूजन करणार आहे. कॉरिडोर 2019पर्यंत पूर्ण होणार आहे. पाकिस्तान सरकारनं भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
कसं असणार करतारपूर साहिब कॉरिडोर?
करतारपूर साहिब कॉरिडोरअंतर्गत दिल्ली-करतारपूर रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे काम पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात करण्यात येणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून वाहत येणाऱ्या रावी नदीच्या किनारी असलेल्या गुरुद्वारा करतारपूर साहिब जाण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे भारतीय तीर्थ यात्री त्या पवित्र ठिकाणी जाऊ शकतील. करतारपूर साहिब शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांचं निवासस्थान आहे. गुरुनानक यांनी स्वतःच्या आयुष्यातील 17 वर्षं 5 महिने 9 दिवस इथे घालवले होते. त्यानंतर त्यांचं कुटुंबीय तिथे वास्तव्याला आलं. त्यांच्या आई-वडिलांचं निधनही तिथेच झालं आहे. त्यामुळेच शिखांसाठी हे श्रद्धास्थान आहे.