'सरकारे येतात आणि जातात, पण शिवसेना हा एक विचार'; शिंदेगटालाही राजीनाम्याचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:11 AM2022-06-30T11:11:43+5:302022-06-30T11:12:36+5:30

गोव्यात आज शिंदे गटाची बैठक होत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होत आहे.

'Governments come and go, but Shiv Sena is an idea'; Eknath Shinde gata's kesarkar attack on BJP | 'सरकारे येतात आणि जातात, पण शिवसेना हा एक विचार'; शिंदेगटालाही राजीनाम्याचं दु:ख

'सरकारे येतात आणि जातात, पण शिवसेना हा एक विचार'; शिंदेगटालाही राजीनाम्याचं दु:ख

Next

मुंबई - शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदेंच्या बंडाचा उत्तरार्ध हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यात आज शिंदे गटाच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. यासंदर्भात बोलताना दिपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे आज मुंबईला येतील, असे सांगितले. तर, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांवरी नाराजी व्यक्त केली. 

गोव्यात आज शिंदे गटाची बैठक होत असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होत आहे. सरकारे येत असतात, जात असतात पण विचार महत्त्वाचा असतो. आम्ही शिवसेनेचेच आहोत, शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्वाचा हा एक विचार आहे. त्यामुळे, आमचा वेगळा गट वगैरे नाही, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली. आमचा मंत्रीपदासाठी बंड असेल तर मग आमच्याकडे 6 मंत्री सोबत का आले हेही विचार व्हावा. आमचा बंड हा विचारधारेचा होता, असेही केसरकर यांनी म्हटले. 

भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांवरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुणीतरी एका नेत्याने प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते, पण दहा -10 नेते प्रतिक्रिया देत होते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या प्रतिक्रियांमुळे आम्ही दुखावले जाणारच, कारण आम्ही आमच्या नेत्याविरुद्ध बंड केला नव्हता, आमचा बंड राष्ट्रवादी-काँग्रेसविरुद्धचा होता, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री पायउतार झाले याचं आम्हालाही दु:ख झालं ना. डोळ्यात अश्रू आले ना, ते अश्रू दिखाव्याचे नाहीत. सत्तास्थापन करत असताना कोणीतरी व्यक्तीगत का बोलावं. प्रत्येकाने भावनांची कदर ठेवली पाहिजे, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतोच ना, असेही केसरकर यांनी म्हटले.    

भाजपच्या विजयानंतर नाराजी

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या अनेकांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या, भाजप नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही. कारण, ते ज्या पद्धतीने बोलत होते, त्यातून काहींची मने दु:खी होतात. आमच्या गटाकडून ज्याप्रमाणे प्रवक्त म्हणून मी एकटा बोलतो, तसेच भाजपकडूनही ठराविक लोकांनीच बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी बोलले असते तर ते स्विकारार्ह होतं, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या विजयी जल्लोषानंतर काहीशी नाराजीही व्यक्त केली आहे. मी फडणवीस यांना जाहीर विनंती करतो, हे ताबडतोब थांबवा. कारण, आम्हीही आमच्या नेत्यासोबत संघर्ष केला. आता, तुम्ही सत्तेवर येत असाल तर त्या लोकांना ताबडतोब थांबवलं पाहिजे, अशी विनंती केसरकर यांनी फडणवीसांकडे केली आहे. 
 

Web Title: 'Governments come and go, but Shiv Sena is an idea'; Eknath Shinde gata's kesarkar attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.