पाटणा: राज्यपाल कळसूत्री बाहुली असतात का, असा प्रश्न बिहारच्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आला. त्यामुळे परीक्षेला आलेले विद्यार्थी चकीत झाले. भारताच्या आणि विशेषत: बिहारच्या राजकारणातील राज्यपालांचे स्थान काय? ते केवळ कळसूत्री बाहुली असतात का?, असे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. यानंतर राज्यसेवा आयोगानं यामध्ये आपली चूक नसल्याचं स्पष्ट केलं. प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षकच यात दोषी असल्याचं आयोगानं म्हटलं. त्या प्रश्नात कोणतीही चूक नाही. मात्र कळसूत्री बाहुली हा शब्द टाळता आला असता, असं आयोगानं म्हटलं. सध्या बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपाची सत्ता आहे. संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार सरकारचं नेतृत्व करत आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.