नवी दिल्लीः देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असताना आणि महागाईचा भडका उडाला असताना नागरिकांच्या रागाचा स्फोट कधीही होऊ शकेल, अशी चिन्हं आहेत. त्याचा धसका घेऊन सरकारही कामाला लागल्याच्या बातम्या येताहेत. परंतु, केंद्र सरकारने ठरवलं तर ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंतही कमी करू शकतं, असा दावा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यात. त्यामुळे लिटरमागे सरकारला १५ रुपये कमी मोजावे लागताहेत. तरीही, सरकार नागरिकांच्या खिशातून ही रक्कम काढतंय. त्यासोबतच, १० रुपयांचा अतिरिक्त करही जनतेकडून वसूल केला जातोय. तो थांबवल्यास, जनतेला इंधन दरात थेट २५ रुपयांचा दिलासा मिळू शकेल, असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे. त्याचवेळी, सरकार असं काही करणार नाही, पेट्रोल-डिझेलचे दर १-२ रुपयांनी दर कमी करून ते नागरिकांना फसवतील, असा टोलाही त्यांनी हाणलाय.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात लिटरमागे २.५४ रुपयांची, तर डिझेलच्या दरात २.४५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढत्या दरांमध्ये जनतेचा रोष वाढत चालल्याचं पाहून मोदी सरकारही हादरलंय. डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. हे तापलेलं वातावरण पाहून, या परिस्थितीतून लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल दिलंय. त्यामुळे आता ते कोणता कर किती कमी करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.