राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची बाजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन मानले 'महाराष्ट्राच्या जनतेचे आभार'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 10:26 AM2017-10-10T10:26:38+5:302017-10-10T11:16:32+5:30
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर झाले. त्यात बहुतांश ठिकाणी नव्या चेह-यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 3 हजार 131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर झाले. त्यात बहुतांश ठिकाणी नव्या चेह-यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रस्थापित कुटंबांतील उमेदवारांना गावक-यांनी सुट्टी दिली. निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नसली तरी अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ''महाराष्ट्रतील जनतेचे मन:पूर्वक आभार'' मानणारे ट्विट केले आहे.
भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार, असे ट्विट मोदींनी केले आहे. याशिवाय मोदींनी महाराष्ट्र भाजपाचंही कौतुक केलं आहे. ''ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आणि गरिबांचा भाजपच्या विकासाच्या अजेंडाला पाठिंबा आहे, असंच हा विजय दर्शवत आहे'', असेही मोदींनी ट्विट केले आहे. ''या विजयाबद्दल मी महाराष्ट्र भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन करतो'', असंही मोदी म्हणालेत.
I thank people of Maharashtra for the impressive win of BJP in Gram Panchayat polls across the state. महाराष्ट्रतील जनतेचे मन:पुर्वक आभार.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017
Wonderful victory of @BJP4Maharashtra in rural areas shows the unwavering support of the farmers, youth & poor for BJP's development agenda.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017
I congratulate @BJP4Maharashtra, @Dev_Fadnavis and @raosahebdanve for the impressive performance in Gram Panchayat polls across the state.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017
ग्रामपंचायत निवडणूक: सरपंचपदावर राजकीय दावेदारी
राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ही निवडणूक चिन्हावर झालेली नसल्याने या दाव्यात कितपत सत्य आहे, याविषयी संशय आहे. ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ‘ज्याच्या हाती ससा, तो पारधी’ या न्यायाने दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला गेल्याने राजकीय दावेदारी सुरू झाली आहे. एकेका ग्रामपंचायतीवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याचेही दिसून आले. स्थानिक विकास आघाड्या स्थापन करून राजकीय जोडे बाजूला ठेवतही अनेक ठिकाणी निवडणूक झाली. अशा कोणत्याही पक्षाच्या नसलेल्या सरपंच अन् सदस्यांना आपल्या तंबूत आणण्यासाठी स्थानिक मोठे नेते कामाला लागले आहेत.
केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने निधी मिळण्याच्या आशेने भाजपासोबत जाण्याकडेही अनेकांचा कल दिसतो. एक हजारावर ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थक निवडून आल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आले की, आम्ही जिल्ह्याजिल्ह्यांतून माहिती गोळा करीत आहोत. भाजपाचे दावे खोटे आहेत हे आम्ही आकडेवारीनिशी सिद्ध करू. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही माहिती देऊ. तर अनेक ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगले यश मिळाले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. राज्यातील सरपंचांचा सत्कार सोहळा लवकरच आयोजित करून भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.