शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:24 AM2020-01-20T04:24:07+5:302020-01-20T04:24:37+5:30
मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले
चेन्नई : अलीकडेच लागू करण्यात आलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) मुस्लिमांना पक्षपाती वागणूक देणारा आहे, हा आरोप निखालस खोटा आणि बिनबुडाचा आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी येथे केला आणि खरे तर मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून शेजारी देशांतून आलेल्या अधिक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले.
‘सीएए’च्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेल्या देशव्यापी ‘जन जागरण अभियाना’चा एक भाग म्हणून येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सितारामन म्हणाल्या की, सन २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेल्या ५६६ मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते. मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले. पाकिस्तानी गायक अदनान सामी व बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांना दिलेले नागरिकत्व ही याची ठळक उदाहरणे आहेत, असे त्या म्हणाल्या. एकट्या गेल्या वर्षात २,८३८ पाकिस्तानी, ९४८ अफगाण व १७२ बांगलादेशी स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले गेले. (वृत्तसंस्था)
निर्वासित छावण्यात ५०-६० वर्षे
पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानमधून आलेले लोक देशाच्या विविध भागांतील निर्वासित छावण्यांमध्ये गेली ५०-६० वर्षे राहत आहेत. या छावण्यांमधील लोकांची अवस्था पाहिलीत तर हृदय पिळवटून जाईल. श्रीलंकेतून आलेले निर्वासितही अशाच छावण्यांमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधांविना राहत आहेत, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, या लोकांना अधिक चांगले आयुष्य जगता यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला नाही.