बोंबला! लग्नाच्या दिवशी 'ती' नवरदेवाला पळवून घेऊन गेली, नवरी बिचारी वाट पाहत राहिली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:08 PM2021-12-05T17:08:11+5:302021-12-05T17:09:32+5:30
लग्नाला काही तास उरले असताना नवरदेव अचानक गायब झाला होता. त्याचं कारण आता समोर आलं असून त्याच्या प्रेयसीने त्याला पळवून नेल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लग्नाच्याच दिवशी प्रेयसी नवरदेवाला पळवून घेऊन गेली आणि नवरी बिचारी वाट पाहत राहिल्याची घटना समोर आली आहे, राजस्थानच्या झुंझुनू येथील मेदारामध्ये ही हैराण करणारी घटना घडली. नवरा पळून गेल्याचं समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. वधू पक्षाने नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला काही तास उरले असताना नवरदेव अचानक गायब झाला होता. त्याचं कारण आता समोर आलं असून त्याच्या प्रेयसीने त्याला पळवून नेल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानच्या झुंझुनू भागातील रवी कुमार नावाच्या तरुणाचं लग्न धींगडिया गावच्या कवितासोबत ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही वेळातच नवरदेवाला घेऊन वऱ्हाड येईल आणि थाटामाटात लग्न पार पडेल, या तयारीत वधूकडील मंडळी सज्ज होती.
प्रेमासाठी काय पण! लग्नमंडपातून नवरदेव झाला गायब
रवीच्या घरीदेखील सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेमंडळी जमली होती आणि काही वेळात ते लग्नासाठी निघणार होते. वऱ्हाड निघण्यापूर्वी काही वेळ नवरदेव रवी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला. थोड्याच वेळात परत येतो, असं सांगून तो बाहेर गेला खरा, मात्र वऱ्हाड निघण्याची वेळ झाली तरी परतला नाही. काही वेळ घरच्यांनी आणि पाहुणेमंडळींनी त्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ उलटूनही तो न आल्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत रवी हरवल्याची तक्रार दिली.
रवीचं त्याच्यात गावातील एका तरुणीवर प्रेम होतं. आपलं लग्न झालं, तर प्रेमकहाणी अपूर्ण राहिल, असं वाटून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला आणि त्याच दिवशी पळून जाण्याचं ठरवलं. लग्नाला निघण्यापूर्वी काही तास अगोदर रवी घराबाहेर पडला आणि या तरुणीसोबत पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अजब लग्नाच्या गोष्टीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.