नवी दिल्ली : आता लवकरच घर खरेदी करु पाहणाऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅट यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आला आहे. तर, सवलतीच्या घरांवरील जीएसटी 8 वरून एक टक्क्यावर करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. येत्या 1 एप्रिलपासून जीएसटीचा नवीन दर लागू करण्यात येणार आहे.
दिल्ली-एनसीआर, कोलकाता, मुंबई, बंगळुरु यासारख्या मेट्रो शहरांमध्ये स्वस्त घरांच्या गटात 60 स्केअर मीटर कार्पेट एरिया असणार आहे. तर नॉन मेट्रो शहरांमध्ये 90 स्केअर मीटर कार्पेट एरिया असणार आहे, त्याची किंमत 45 लाखापर्यंत असेल, असे अरुण जेटली यांनी सांगितले.
दरम्यान, बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवर सध्या 12 टक्के जीएसटी असला, तरी बिल्डरांना त्याचे इनपुट क्रेडिट मिळत असल्यामुळे प्रत्यक्षातील हा कर 5 ते 6 टक्केच पडतो. तथापि, बिल्डर इनपुट सवलत ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करीत नाहीत. त्यामुळे तो 5 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.