नवी दिल्ली, दि. 14 - वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू होऊन अनेक दिवस झाले आहेत तरीही जीएसटीबाबत संभ्रम कायम आहे. जीएसटीबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या एखाद्या भागात जरी एअर कंडिशन असेल तरी तेथून जेवण पॅक करून नेताना जीएसटी भरावा लागेल. एसी हॉटेलमधून जेवण पार्सल नेताना 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. म्हणजेच तुम्ही त्या हॉटेलच्या एसी नसलेल्या भागात जरी जेवण करण्यास बसला तरी तुम्हाला जीएसटी भरावा लागेल.
जीएसटीबाबत सातत्याने विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) द्वारे उत्पादन शुल्क व सीमाशुल्क केंद्र मंडळाने (सीबीईसी) याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. जर एखाद्या हॉटेल किंवा बारच्या पहिल्या मजल्यावर एअर कंडिशन असेल आणि तळमजल्यावर जेथे एसी नसेल पण जेवणाची सोय असेल तर तेथेही जीएसटी आकारला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच हॉटेलच्या एखाद्या भागात जरी एअर कंडिशन असेल तरी तेथून जेवण पॅक करून नेताना 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.
देशभरात 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी कर आकारण्यास सुरूवात झाली आहे. हे आहेत रेस्टॉरंटचे दर-- एसी नसलेल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यास 12 टक्के जीएसटी - एसी असलेल्या किंवा परवानाधारक बारमध्ये 18 टक्के जीएसटी- पंचतारांकित हॉटेलमध्ये 28 टक्के जीएसटी