अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. मात्र सुरुवातीच्या 171 जागांच्या कलांमध्ये भाजपा 84 जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस 86 जागांवर पुढे आहे. कोणालाही अपेक्षा नसताना काँग्रेस भाजपाला कडवी झुंज देताना दिसत आहे. 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यात झालेल्या मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. राज्यातील 182 जागांसाठी 2.97 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला होता. गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपा आपापल्या विजयाचा दावा करत आहे. राज्यात बहुमताचा आकडा 92 आहे.
भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. एक्झिट पोलने भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी झालेल्या मतदानात 66.75 टक्के मतदान झालं होतं. तर दुस-या टप्प्यात 68.70 मतदान झालं होतं. दुस-या टप्प्यात 93 टक्के मतदान झालं होतं.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरु केली होती. रविवारी रात्री भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध दावे करण्यात येत होते. तर दुसरीकडे भाजपाने मतमोजणीपूर्वीच मुंबईमध्ये विजयाचे पोस्टर्सही लावले होते. गुजरातमध्येही रविवारी रात्रीच भाजपाकडून विजयाची तयारी पूर्ण केली होती.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले होते. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले होते. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला होता.