Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये बैलाने उधळली काँग्रेसची प्रचारसभा, कार्यकर्ते पळाले, गहलोत यांनी गंभीर आरोप केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:53 AM2022-11-29T11:53:47+5:302022-11-29T11:55:29+5:30
Gujarat Assembly Election 2022: काँग्रेसच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भाषण देत असताना सभेच्या ठिकाणी एक बैल घुसला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ झाला.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. गुजरातमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भाषण देत असताना सभेच्या ठिकाणी एक बैल घुसला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ झाला. तसेच सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. अखेर या सांडाला कसेबसे सभास्थळावरून हाकलण्यात आले. दरम्यान, काँग्रेसची सभा उधळण्यासाठी भाजपाने हा कट रचल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केला आहे.
बैलाला सभास्थळावरून हाकलल्यानंतर गहलोत यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले की, हे गाई-बैल मी लहानपणापासून पाहतोय. जेव्हा कधी काँग्रेसची सभा असते तेव्हा भाजपावाले सभा उधळण्यासाठी गाय किंवा बैलाला घुसवतात, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक बैल सभेच्या ठिकाणी येताना दिसत आहे. तसेच तो गर्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत.