गुजरात विधानसभा निवडणूक - उद्या सहा केंद्रांवर होणार फेरमतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 07:57 PM2017-12-16T19:57:02+5:302017-12-16T20:10:21+5:30
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार उद्या रविवारी गुजरातमध्ये सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे.
अहमदाबाद - निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार उद्या रविवारी गुजरातमध्ये सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. ज्या मतदान केंद्रांवर फेर मतदान होणार आहे तिथल्या मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शुक्रवारी रात्री निवडणूक आयोगाने फेरमतदानाचे आदेश दिले. दुस-या टप्प्यात मतदान झालेल्या सहा केंद्रांवर फेरमतदान होईल.
तत्पूर्वी या सहा केंद्रातील ईव्हीएम मतदान यंत्रातील सर्व डाटा काढून टाकण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी मतदान यंत्राची मॉक ड्रील चाचणी घेतली जाते. यावेळी मतदान यंत्रात नोंद झालेला डाटा काढायचा राहून गेल्याने फेरमतदान होत आहे.
वडगाम मतदारसंघाच्या छानियान 1 आणि छानियान 2 मतदान केंद्रावर, विरगामच्या बूथ नं 27, दासकोरी मतदारसंघाच्या नावा नरोडा, सावली भागातील नहारा 1 आणि साकारडा 7 या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी बीबी स्वाईन यांनी दिले आहेत. दलित नेता जिग्नेश मेवानी वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर आणि दुस-या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान झाले. येत्या 18 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
हार्दिक पटेल म्हणतो भाजपा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत
गुजरातमध्येही भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे.
शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले आहेत. 'शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये मोठी गडबड करायला चाचली आहे. भाजपा गुजरात निवडणूक हारणार आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.