२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:33 PM2024-11-30T14:33:40+5:302024-11-30T14:39:03+5:30
पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने एका मजुराला अटक केली आहे.
Gujarat ATS : अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने भारताबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या नौदलातील अधिकाऱ्याला पुरवली आहेत. ज्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतं. हा प्रकार उघडकीस येताच गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पाठवले होते.
गुजरातच्या किनारपट्टीवरील एका खाजगी कंपनीत काम करणारा मजूर दररोज २०० रुपये मिळावेत म्हणून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, असा धक्कादायक खुलासा गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. गुजरातमधील द्वारका येथे काम करणारा दीपेश गोहिल फेसबुकवर असिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. गोहिलने द्वारकेतील ओखा भागातून संवेदनशील फोटो गोळा केले आणि ते पाकिस्तानला पाठवले, अशी माहिती एटीएसने दिली. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने दीपेश गोहिलला अटक केली आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांच्या हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केल्याबद्दल एटीएसने शुक्रवारी गोहिलला अटक केली. पोलीस अधीक्षक (एटीएस) के सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तटीय देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा जेट्टी येथे वेल्डर म्हणून काम करणाऱ्या दीपेश गोहिलने जेट्टीवर येणाऱ्या तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती एका पाकिस्तानी महिलेसोबत शेअर केली.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दीपेश एका गुप्तहेराकडून दररोज २०० रुपये घेत असे. आतापर्यंत दीपेशने संवेदनशील माहिती पुरवून सुमारे ४२ हजार रुपये कमावले होते. दीपेशने ओखा बंदरात काम करताना फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात आला. पाकिस्तानी गुप्तहेराने फेसबुकवर असिमा नावाचे बनावट प्रोफाईल तयार करून दीपेशशी मैत्री केली होती. यानंतर ते व्हॉट्सॲपवरही बोलू लागले. ओखा बंदरात येणाऱ्या भारतीय तटरक्षक जहाजांची नावे आणि क्रमांक पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवण्याचे काम दीपेशकडे होते.
दरम्यान, दीपेशच्या अटकेनंतर पाकिस्तानी गुप्तहेराचे खरे नाव अद्याप समोर आलेले नाही. एटीएसचे पथक या गुप्तहेराच्या शोधात असून दीपेशचीही या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. दीपेश ज्या क्रमांकावर सर्व माहिती पाठवत होता तो पाकिस्तानचा आहे. तटरक्षक दलाच्या बोटी तैनात असलेल्या भागापर्यंत दिपेश गोहिलची ओळख होती अशीही माहिती एटीएसने दिली.