आईच्या उपचारांचा खर्च भागवण्यास मुलगा असमर्थ, संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:38 PM2019-01-01T18:38:13+5:302019-01-01T18:42:41+5:30
गुजरातमधील जामनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. आईच्या उपचारांवरील खर्चाचे बिल भरण्यास असमर्थ ठरल्यानं एका मुलानं आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसहीत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
जामनगर - गुजरातमधील जामनगर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. आईच्या उपचारांवरील खर्चाचे बिल भरण्यास असमर्थ ठरल्यानं एका मुलानं आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसहीत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. दीपक सकारिया (वय 45 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सकारिया यांचे किराणामालाचे दुकान होते. त्यांना आपल्या वयोवृद्ध आईच्या उपचारांवरील खर्चाची रक्कम भरताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आईच्या उपचारांवरील खर्च भागवण्यास आपण असमर्थ आहोत, या विचाराने ते तणावात होते आणि याच तणावातून सकारिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एसपी शरद सिंघल यांनी सांगितले की, 'सकारिया आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली'.
मृतांमध्ये 5 वर्षांच्या मुलाचाही समावेश
सूर्यमुखी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. दीपक सकारिया (वय 45 वर्ष), त्यांची पत्नी आरती सकारिया (वय 42 वर्ष), मुलगी कुमकुम (वय 11 वर्ष), मुलगा हेमंत (वय 5 वर्ष) आणि दीपक यांची आई जया पन्नाला (वय 80 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.