गुजरात दंगल प्रकरण : तिस्ता सेटलवाड गुजरात एटीएसच्या ताब्यात, मुंबईतून नेले अहमदाबादला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:06 AM2022-06-26T09:06:24+5:302022-06-26T09:06:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते.
मुंबई : गुजरात दंगलप्रकरणी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतून ताब्यात घेत कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या संस्थेतील फंडिंगबाबतही एटीएस तपास करत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते. मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिटही मिळाली आहे. २००६ मध्ये झाकियाने मोदींविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. २००७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने तो न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठविला. दुसरीकडे, २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दंगलीशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी माजी सीबीआय संचालक आरके राघवन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी न्यायालयाचा निकाल अतिशय काळजीपूर्वक वाचला आहे. निकालात तिस्ता सेटलवाड हिच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख आहे. तिस्ता सेटलवाड हिने पोलिसांना दंगलीबाबत निराधार आणि खोटी माहिती दिली होती, असेही शहा यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितले.
अहमदाबादमधील गुन्ह्याच्या चौकशीसाठी कारवाई
- गुजरात एटीएसचे पथक शनिवारी सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने सेटलवाड यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील घरी पोहोचले.
- तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेऊन सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहमदाबाद येथे नेण्यात आले.
- अहमदाबाद येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.