जाहिरातीवरून वाद; तनिष्क शोरूमने दरवाजावर चिटकवला माफिनामा, कुठल्याही प्रकारचा हल्ला नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 05:07 PM2020-10-14T17:07:30+5:302020-10-14T17:10:28+5:30
गुजरातमधील कच्छ येथील गांधीधाम परिसरातील तनिष्क स्टोअरचे मॅनेजर राहुल मनुजा यांनी सांगितले की, स्टोअरवर हल्ला झाला नाही. मात्र, धमकीचे फोन येत आहेत. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत. (Gujarat Tanishq showroom)
अहमदाबाद -गुजरातच्या (Gujarat) कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे, ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या (Tanishq) जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर, शोरूमने दरवाजावर माफीनामा चिटकवला आहे. तसेच, शोरूमवर कसल्याही प्रकारचा हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे. तनिष्कने दोन धर्मासंदर्भातील एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी ही जाहिरात मंगळवारी मागे घेतली.
गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या शोरूमवर हल्ला झाल्याची माहिती खोटी असून गांधीधाममध्ये तनिष्क स्टोअरमध्ये दोन जण आले आणि त्यांनी मॅनेजरला गुजरातीतून माफी मागण्यास सांगितली. यानंतर शोरूमने माफी मागितली. मात्र, दुकानात अजूनही धमकीचे फोन येत असल्याची माहिती कच्छ (पूर्व)चे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी दिली आहे.
गुजरातमधील कच्छ येथील गांधीधाम परिसरातील तनिष्क स्टोअरचे मॅनेजर राहुल मनुजा यांनी सांगितले की, स्टोअरवर हल्ला झाला नाही. मात्र, धमकीचे फोन येत आहेत. पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत.
तनिष्कने एका जाहिरातीत दोन वेगवेगळ्या धर्मांना मानणाऱ्या लोकांचे एक कुटुंब दाखवले होते. मात्र, यानंतर सोशल मीडियावर येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून त्यांनी आपली जाहिरात मंगळवारी मागे घेतली. यांत काही लोकांनी त्यांच्यावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘खोट्या धर्मनिरपेक्षते’ला उत्तेजन देत असल्याचा आरोप केला.
तनिष्कने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की न कळत भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. या जाहिरातीने आपल्या उद्देशा व्यतिरिक्त भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावर तीव्र प्रतिक्रियादेखील समोर आल्या आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया आणि इतरत्र चर्चांना उधान आले आहे. तनिष्क गेल्या आठवड्यातच ही जाहिरात प्रसिद्ध केली होती.
'तनिष्क' जाहिरातीचा वाद! हल्ल्याची माहिती खोटी, गुजरातच्या शोरूमला आले धमकीचे कॉल
जाहिरातीसंदर्भात ट्विटरवर हॅशटॅग ‘बायकॉट तनिष्क’ ट्रेंड -
जाहिरातीसंदर्भात ट्विटरवर हॅशटॅग ‘बायकॉट तनिष्क’ ट्रेंड करू लागला आहे. या जाहिरातीवरून वाद सुरू झाला आणि जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी आणि टाटाच्या ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यासाठी ट्विट करणे सुरू झाले. तनिष्कने सर्वप्रथम यूट्यूबवर आपल्या जाहिरातीवरील कमेंट्स, लाइक्स आणि डिस्लाइक्स बंद केले. तसेच मंगळवारी हा व्हिडिओ पूर्णपणे मागे घेतला.
काय म्हणालं अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया -
तनिष्कने एका निवेदनात म्हटले आहे, 'भावना दुखावल्या गेल्याने आम्ही अत्यंत दुःखी आहोत. तसेच भावना दुखावल्या गेल्याबरोबरच आमचे कर्मचारी, भागीदार आणि स्टोर्सचे कर्मचारी यांची सुखरूपता लक्षात घेत ही फिल्म मागे घेत आहोत.' मात्र, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ने तनिष्काची जाहिरात त्यांच्या स्टँडर्डला अनुकूल असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्याविरोधातील ‘सांप्रदायिक घालमेल करण्याला उत्तेजन देण्यासंदर्भातील’ तक्रार फेटाळून लावली आहे.
काय होता आरोप?
हिंदू सुनेचे डोहाळे जेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही 45 मिनिटांची जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप झाला. यानंतर ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदू सुनेच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे कौतुक केले. मात्र, भाजपा नेत्या कोतापल्ली गीता यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. यानंतर तनिष्कने ही जाहिरात सोशल मीडियावरून मागे घेतली.