वॉश्गिंटन – ‘सिख फॉर जस्टिस’(Sikhs For Justice) नावाच्या एका संघटनेने भारताचा खलिस्तानी नकाशा जारी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यात केवळ पंजाबच नव्हे तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्हे खलिस्तानाचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सिख फॉर जस्टिस अमेरिकेतील एक संघटना आहे जी भारतातील पंजाबला वेगळं करून खलिस्तान बनवण्याची मागणी करत आहे.
या संघटनेचे प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू(Gurpatwant Singh Pannu) आहे. ज्याला भारतात बंदी आहे. भारताने बेकायदेशीर संघटनेच्या रुपात सिख फॉर जस्टिसवर २०१९ मध्ये बंदी आणली होती. खलिस्तान बनवण्याच्या मागणीसाठी २०१९ मध्ये पंजाब स्वतंत्रता जनमत संग्रह अभियानाची सुरुवात केल्यानंतर या संघटनेवर भारत सरकारने कारवाई केली आहे. याच संघटननेने आता भारताचा वादग्रस्त नकाशा जारी करत सिख राष्ट्र खलिस्तान असं त्याला नाव दिल्याने खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांचा समावेश
या संघटनेने दावा केलाय की, लवकरच भारताचा या भागावर कब्जा करून खलिस्तान निर्माण केला जाईल. यात राजस्थानच्या बुंदी, कोटासारख्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर, सीतापूरसह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे. संघटनेचे प्रमुख पन्नू त्या ९ लोकांमध्ये सहभागी आहेत. ज्यात केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवायांसाठी त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
पन्नूविरोधात देशद्रोहाचे खटले
पंजाब पोलिसांनी खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या सिख फॉर जस्टिस संघटनेचे संस्थापक पन्नू आणि त्याच्या साथीदारांवर मागील वर्षी देशद्रोहाचे खटले दाखल केले आहेत. अमृतसरमध्ये पन्नूवर भारतीय संविधान आणि राष्ट्रीय ध्वज जाळल्याप्रकरणी आणि दुसऱ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या व्हिडीओत पन्नू गटाचे लोक सिख समुदायातील लोकांना जनमत संग्रह २०२० च्या बाजूने आणि भारतीय संविधानाविरोधात वारंवार विधानं करून लोकांची माथी भडकवत असतात.
कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?
दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा पंजाबच्या खानकोट गावातील रहिवासी आहे. आजही गावात त्यांच्या कुटुंबीयांची जमीन आहे. याच गावात गुरपतवंत सिंग पन्नूने सिख फॉर जस्टिस ही संघटना स्थापन करत अखंड भारत देशाला तोडण्यासाठी मोहिम उभी केली. देशाच्या विभाजनानंतर लाहौरहून हे कुटुंब खानकोटला आलं होतं. गुरपतवंत सिंगचे वडील महिंदर सिंग मार्कफैडमध्ये नोकरी करत होते. गुरपतवंत सिंगचा भाऊ परदेशात नोकरी करतो. युवा तरुणांना लालच देऊन देशविरोधी कृत्य करण्यासाठी गुरपतवंत सिंग पन्नू त्यांना उकसवतो.